श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
☆ कवितेचा उत्सव ☆ निसर्गाची ‘दीपावली’ ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆
हिरवळीच्या अंगणात या
सोनपावले अवतरली
मेघमुखातून समृद्धीच्या
गर्जत आली दीपावली…
तृणा डोई तेजोमयी ते
आकाशपाळणे लखलखती
दवबिंदूंपरी आळवित जाते
गीत चराचे मनातूनी…
पंख जाहलो फुलपाखरांचे
स्नेह स्फुरले तनातूनी
रंग तयाचे गेले रेखीत
ह्रदयावरी या रंगावली…
अतिथीसम इंद्रधनु हा
पहा गृही मज डोकावितो
चैतन्याची कमान दारी
मोद अखंडित पाझरतो…
डोंगर उंची सद्गुणांची
अशी भिडते आकाशी
प्रकाश लेणी दीपसणाची
उजळीत जाते काळीजकुशी…
© श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
मिरज, जि. सांगली
मोबाईल : 9922048846
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈