प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ पणती…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
घ्या , घ्या हो ,घ्या
पणत्या माझ्या घ्या ना
जरा वय ही माझे पहा ना …
घर माझे हो
आहे झोपडी साधी
झोपण्यास नाही गादी ….
वय झाले हो
तरी नशिबी काम
ठेविल जसा तो राम..
तुम्ही घ्या पणत्या
नातू घरी हो माझा
पाहतो वाट तो राजा..
मिळता पैसे
नेईन ज्वारी थोडी
भाकरीत आहे गोडी..
मी कष्टाची
पहा भाकरी खाते
कष्टांशी माझे नाते ..
या पैशांनी
थोडे आणिन तेल
अंगणी दिवा लाविन…
पसरत नाही
हात कुणा ही पुढती
ही आहे माझी नीति …
तुमच्याच मुळे
दोन घास पोटात
लेकरांच्याही ओठात..
आम्ही गरिबांची
तुम्हा मुळे हो दिवाळी
गरिबी ही लिहिली भाळी..
नका जाऊ पुढे
टाकून म्हातारीला
ही सारी प्रभुची लीला…
नाही दोष
पहा नशिबाला देत
कष्टण्या दिले हो हात…
जो वरी श्वास
देईल तोच हो काम
बोला राम राम नि राम …
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: ८/११/२०२० वेळ : रात्री १२:२६
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈