श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 169
☆ कौलारू घर… ☆
आयुष्याला पुरून उरलो आहे मी तर
पदोपदी हा झाला होता जरी अनादर
ऊब सोबती तुझी मिळाली कधीच नाही
पांघरण्याला मला दिली तू ओली चादर
ह्या गुढघ्यांनी हात टेकले असे अचानक
आधाराला निर्जिव काठी चढलो दादर
शीतलतेची होती ग्वाही म्हणुन बांधले
शेण मातिचे चार खणाचे कौलारू घर
ओढे नाले ढकलत होते वहात गेलो
अंति भेटला खळाळणारा अथांग सागर
जरी सुखाच्या रथात बसुनी प्रवास केला
खड्ड्यांचा हा रस्तोरस्ती होता वावर
जीवन म्हणजे असतो कापुर कळले नाही
अल्प क्षणातच जळून गेला होता भरभर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈