श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 172
☆ स्वामित्व… ☆
हे विश्व तुझ्या बापाचे नव्हते आणिक नाही
स्वामित्व तुला देहाचे नव्हते आणिक नाही
अंगावर साधी तेव्हा लंगोटीही नव्हती
काहीच तुझ्या नावाचे नव्हते आणिक नाही
स्वामित्व जरी मुंग्यांचे नाग डसत हे होते
वारूळ कधी सापाचे नव्हते आणिक नाही
हे आप्त निघाले वैरी मात मिळाली म्हणुनी
हे राज्य इथे दुबळ्यांचे नव्हते आणिक नाही
सत्तेसाठी नाही ते रयतेसाठी लढले
हे राज्य इथे जाचाचे नव्हते आणिक नाही
शृंगार करूनी बसली नजरा वाटेवरती
काहीच तशा अर्थाचे नव्हते आणिक नाही
देहास निघाला घेउन एकटाच यात्रेला
कोणीच तुझ्या गावाचे नव्हते आणिक नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈