श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 176
☆ अन्याय… ☆
माणसांना पोसलेले तू दुधावर
केवढा अन्याय झाला वासरावर
हे दुधाचे राजकारण काय आहे ?
वाढती दर भार त्याचा माणसावर
बंद गोठे त्यात आम्हा कैद केले
काल सोबत कृष्ण यमुनेच्यातटावर
स्वार्थ जपण्या खाद्य पोषक देत आहे
फार मिळते दूध सरकी चारल्यावर
ताक मठ्ठा खालच्या लोकात वाटा
लक्ष माझे फक्त मलई चाखण्यावर
गाय विकली आज त्याने खाटकाला
काल होती माय आता ती जनावर
कोण मेले कोण जगले खंत नाही
राजकारण बेतते आहे जिवावर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈