श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ घ्या सुखाला खेचूनी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
वृत्त..देवप्रिया (सूट घेवून) (अक्षरे..१५ मात्रा..२६)
(गालगागा गालगागा गालगागा गालगा)
जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी
काय झाले काय नाही द्या तगादा ठेचुनी
झाकलेली पापकर्मे आसवांनी पाहिली
काल केलेल्या चुकांना आज वाचा वाहिली
भोग सारे कालच्या भोगातले घ्या रेचुनी
जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी
का नशेची मागणी गावात आहे वाढली
झिंगणाऱ्यांनीच आहे धिंड त्यांची काढली
नाशवंती या नशेला द्या गड्यांनो ठेचुनी
जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी
काळजी का आपल्यांची आपले नाही कुणी
डांबराची काय गोणी साफ केली का कुणी
राख झालेल्या कणांना काय होते वेचुनी
जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी
काय झाले काय नाही द्या तगादा ठेचुनी
© विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈