महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 121
☆ अभंग… (मित्र…) ☆
सुखात दुःखात, साथ देतो खरा
तोच मित्र बरा, ऐसे जाणा.!!
कठीण समयी, पाठ जो नं दावी
मैत्री ती प्रभावी, प्राचीवर.!!
अडणी क्रियेला, धावून जो येतो
तोच प्रभवतो, मित्र छान.!!
स्वार्थी नी कपटी, लोभी ज्याची वृत्ती
करावी निवृत्ती, संगतेची.!!
पुरण-पोळीचा, ठेचा भाकरीचा
प्रश्न भावनेचा, ज्याचा त्याचा.!!
चंदन सुगंधी, पर-उपकारी
ऐसा मित्र तरी, भाव द्यावा.!!
तयाचे ऐकावे, तयाचे जाणावे
तया सुखवावे, सदैव हो.!!
कवी राज म्हणे, दूध साखरेचा
तैसा मित्रत्वाचा, संग हवा.!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈