सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ वसंत वनी आला ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
कुहू कुहूची तान ऐकता
निसर्गाचा सांगावा आला
पुन्हा नव्याने सृष्टी फुलविण्या
ऋतुराज वसंत आला ||
पानगळीने सरले जीवन
नवे कोंब फुलून आले
इवली नाजूक पाने पोपटी
झाड मोहरून डोलू लागले ||
रंगबिरंगी फुले डोलती
तरुवर अंगोपांगी फुलती
मकरंदला टिपण्यासाठी
फुलपाखरे भिरभिरती ||
पळस पांगारा बहव्याच्या
सवे फुलला गुलमोहर
निसर्गाच्या रंगपंचमीला
अवचित आला किती बहर ||
आमराई ती घमघमते
नवयौवना जणू अवनी
वसंताच्या आगमनाने
चैतन्य पसरते जीवनी ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈