श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 183
☆ ठोकरून गेला… ☆
देहास फक्त माझ्या वापरून गेला
काळीज मी दिलेले ठोकरून गेला
माती सुपीक होती फाळ टोचणारा
देहास तापलेल्या नांगरून गेला
प्रेमात गुंतल्याची चाल बेगडी ती
जाळे शिताफिने तो कातरून गेला
एकाच तो फळाला चाखण्यास आला
कित्येक का फळांना टोकरून गेला ?
दाटी करून स्वप्ने सोबतीस होती
गर्दीत आठवांच्या चेंगरून गेला
मी बाहुलीच झाले फक्त नाचणारी
तोडून सर्व दोऱ्या डाफरून गेला
आकाश चांदण्याचे सोबतीस त्याच्या
पाहून का मला तो गांगरून गेला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈