श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 184
☆ भूमिका… ☆
सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई
सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई
चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम
कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई
चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते
भाकर नंतर त्याच्याआधी जळते बाई
ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?
जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई
सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण
रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई
तिलाच कळते कसे करावे गोड कारले
कारल्यातला कडूपणाही गिळते बाई
पत्नी मुलगी बहीण माता सून भावजय
एकावेळी किती भूमिका करते बाई
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈