सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ स्वागत… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆
चैत्रपालवी, नवी पोपटी,
कुहू§ कोकिळा,घुमते रानी,
पांगाऱ्याची, शाल केशरी,
पिंपळपाने, मऊ गुलाबी.
चाफा अनोखा, सुगंध उधळी,
मोगऱ्याची, कळी खुललेली,
मोहर आंब्याचा, मनमोही,
लेकुरवाळा, फणस खुणावी.
पांढरी फुले, करवंदाची,
घोस हिरवे, जांभूळवृक्षी,
काटेसावर, गर्द गुलाबी,
बहाव्याचे, झुंबर सोनेरी.
अनंत-कुंदा, मधुमालती,
मुकुट फुलांचे, शिरी मिरविती.
पारिजात अन् रातराणी ही,
धुंद आसमंता या करिती.
गुलबाक्षी, रंगीत कोरांटी,
गुलमोहोर, गालिचा पसरी.
शेवंती अन् सदाफुलीही,
वसंतऋतूचे स्वागत करिती.
कडूनिंबाची, छोटी डहाळी,
वस्त्र रेशमी, गाठी केशरी,
कलश झळकता, वेतावरती,
चला उभारू, गुढी सौख्याची.
© सुश्री प्रणिता खंडकर
सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈