सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ वळीव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
रुणझुण रुणझुण ताल निनादत
अलवारसे गीत छेडित
ठुमकत ठुमकत गिरक्या घेत
वळीव सखा येई अवचित
वादळवाऱ्या संगे गर्जत
विंझणवाऱ्या संगे नाचत
वातलहरींची सुखमय संगत
येई कुठूनसा मना सुखवित
तरल सुगंधित फुलती धुमारे
अंगांगावर मृदुल शहारे
शांतवितसे तप्त झळा रे
शतशत गारा -फुले उधळीत
मनभावन हा मित्र कलंदर
खळाळता हा हसरा निर्झर
गुंफूनी अलगद करातची कर
जाई परतून हास्य फुलवित
चंचल अवखळ परी शुभंकर
हवाहवासा मनमीत मनोहर
सौख्यफुलांनी गंधित अंतर
चैतन्यमय सखा येई अवचित
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈