श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 185
☆ रेशमाची शाल… ☆
अक्षरांनाही वळाले लागते
आशयासाठी झुरावे लागते
कागदावर हक्क शाई सांगता
हृदय त्यावर पांघरावे लागते
पीठ थापुन होत नाही भाकरी
दुःख कांडावे दळावे लागते
लाकडाची, धातुची कसली असो
लेखणीलाही झिजावे लागते
प्राक्तनाला येत नाही टाळता
वेळ येता गरळ प्यावे लागते
वादळाला माज सत्तेचा किती
सज्जनांना भिरभिरावे लागते
मानसा तू प्रगत होता या इथे
पाखरांना दूर जावे लागते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈