सौ.विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
☆ || आरती महाराष्ट्राची || ☆ सौ.विद्या वसंत पराडकर ☆
जय देव जय देव,जय महाराष्ट्रा जय महाराष्ट्रा
वीरांच्या देशा,कणखर देशा,जय महाराष्ट्रा
जय देव जय देव. ☘️
शिवबाच्या पराक्रमाने पारतंत्र्याची
संपवली निशा
मावळ्यांच्या साह्याने उदयास आणली स्वातंत्र्याची उषा
जय देव जय देव ☘️
सह्याद्रीचा राजमुकूट हा कसा शिरावर विराजे
पद प्रक्षालन करण्या अरबीच्या
उत्तुंग लाटा साजे
जय देव जय देव. ☘️
सह्यगिरीच्या वक्षातुन सरिता झुळझुळती,गुणगुणती
सह्याद्रिच्या दर्या खोर्यांना साद त्या देती
जय देव जय देव. ☘️
हिमालयावरी संकट येता, सह्याद्री
छातीचा कोट करी
अनुज लक्ष्मण बनुनी साह्य करी
जय देव जय देव. . ☘️
मुंबापुरी हे भूषण तुझे राजधानी ही
वसे
सुंदर,मोहक या तरुणीला
कित्येक मागण्या असे
जय देव जय देव. ☘️
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना काय येथल्या लेण्या असे
मूर्तिकाराची मूर्ती भासे,
ती सजीवतेची प्रतिमा दिसे
जय देव जय देव. ☘️
देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर
जयाचे दिव्यअंलकार
अभंग,ओवी, श्र्लोक यांचा
कंठी घातला हार
जय देव जय देव. . . ☘️
आधुनिक ज्ञान, विज्ञानाने
उन्नत आहे हा देश
अध्यात्मिक ज्ञानाचे माहेरघरच
हा माझा देश
जय देव जय देव. ☘️
कित्येक देश असती,
सुंदर, संपन्न की महान
प्रिय हा देश आमुचा,
महाराष्ट्र महान
जय देव जय देव जय महाराष्ट्रा . ☘️
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈