श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आळवावरचे पाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
आयुष्य तसे तर लटके
आळवावरचे पाणी
पण गात जायचे असते
सुंदर असे आपले गाणे
गाताना सूर जुळावा
इतकेच हवे आपल्याला
पण झटतो उगाच सारे
जे नको तेच जपण्याला
हव्यास असा असतो की
जगण्याला विसरून जातो
पळत्याच्या लागून पाठी
मग धाव धावुनी थकतो
ही घुसमट आयुष्याची
असतेच सोबती आपल्या
ज्या हव्यात गोष्टी त्या तर
नाहीत कुणीही जपल्या
या जंगलातल्या वाटा
चकव्यानी भरल्या येथे
जायचे कुठे पण आता
टेकून आपले माथे
नाहीच कळाले काही
जगताना जगणे कसले
या वाटेवर वणव्याच्या
बघ भलेभले ही फसले
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈