श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 192
☆ करुणा सागर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अनेक वळणे घेते होते तयार अक्षर
भाग्य लाभले अक्षरास ते नाही नश्वर
☆
काला अक्षर भैस बराबर मूर्खांसाठी
अक्षर अक्षर गिरवत होई कुणी कलेक्टर
☆
मुळाक्षरांना ईश्वर मानू पूजा बांधू
मिळेल आशिष होऊ आम्ही सारे साक्षर
☆
अक्षर ओळख नाही त्याची ऐसी दैना
मूर्ख अडाणी आणिक म्हणती त्याला पामर
☆
साहित्याचे जुने बाड अन् ग्रंथ जपूया
संगणकावर देऊ जागा करून आदर
☆
माठ मातिचा इथे बनवला कुंभाराने
वर्गामधले माठ घडवतो आहे मास्तर
☆
मराठीतली अभंग, ओवी अभंग आहे
या संताचा ठेवा म्हणजे करुणा सागर
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈