सौ. सुनिता जोशी
कवितेचा उत्सव
☆ !! गुरु !! ☆ सौ. सुनिता जोशी ☆
आक्रमित हा प्रवास, सत्-मार्ग माझा गुरु
अशाश्वत हा निवास, सत्–वास माझा गुरु..
बेबंध ही नाती, सत्–बंधन माझा गुरु
बेधुंद ही स्तुती, सत्–मंथन माझा गुरु..
चंचल हे मन, सत्–बुद्धी माझा गुरु
नश्वर हे तन, सत्–शुद्धी माझा गुरु..
बेगडी ही माया, सत्–प्रीत माझा गुरु
आभासी ही छाया, सत्–मित्र माझा गुरु..
अनिष्ट ह्या प्रथा, सत्–निष्ठ माझा गुरु
अरोचक ह्या कथा, सत्–गोष्ट माझा गुरु..
दिखाऊ ही विरक्ती, सत्–भाव माझा गुरु
सदोष ही मुक्ती, सत्–ठाव माझा गुरु..
अपरिहार्य हे जगणे, सत्–आचार माझा गुरु
अमतितार्थ हे मरणे, सत्–विचार माझा गुरु..
© सौ. सुनिता जोशी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈