☆ कवितेचा उत्सव ☆ वेळ अशी का जुळून येते? ☆ श्री गौतम कांबळे ☆
म्हणत असता सुंदर जगणे वेळ अशी का जुळून येते
मनी पाहिले स्वप्न देखणे क्षणात सारे पळून जाते
कुणाकुणाचे हट्ट सगळे पुरवत जाणे कसे जमावे
चुकून घडता चूक कशाने कष्ट वांझुटे छळून जाते
दगडालाही म्हणे फुटतो पाझर ओझे पेलत असता
छिन्नीचेही रूप देखणे घावासंगे गळून जाते
ठिणगी पडता संघर्षाची अग्नी भिडतो आकाशाशी
शीतलतेचे रूप चांदणे पौर्णिमेला जळून जाते
होत राहते सुधारणाही असता पाळत सहनशीलता
वागताना न तारतम्याने वेळ अंतीम टळून जाते
© श्री गौतम कांबळे
सांगली
९४२१२२२८३४
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर /श्री सुहास रघुनाथ पंडित ≈