सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “काचेमागचा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(२८ जून २०२३)
पंचतारांकित हॉटेलच्या
फ्रेंच विंडोतून पाऊस
मला वाकुल्या दाखवत होता
म्हणाला “बाहेर ये” घालू धुडगूस
काचेतून पाहत होते सागराला
पावसामध्ये तोही होता उधाणला
लाटांवर लाटा उंच उंच लाटा
फुगड्या सरींशी घालत तोही रमला
काचेने अडवला पावसाचा आवाज
वारा झाडे लाटांचा वाद्यवृंद
बाहेर मैफल रंगली होती
पारदर्शी पावसाने मन झाले धुंद
गावाकडचं आठवलं घर कौलारू
टप टप छिद्रांतून थेंबांची गळती
घराभोवती तळी किती साठायची
त्यात होड्या कागदाच्या तरंगती
काचे मधला पाऊस कसा वेटरसारखा
हाऊ कॅन आय हेल्प यू म्हणणारा
पण गावाकडचा रानातला पाऊस
सखा माझा कानाशी गाणारा
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈