कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 186 – विजय साहित्य
☆ भारत माझा 🇮🇳 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
माझ्यासाठी माझे मी पण ,
देशासाठी ,माझे जीवन
असंख्य जगले, असंख्य जगती
असंख्य त्यास्तव, जन्मा येती. ..!
जन्म घेतला, जगण्यासाठी
जगता जगता , हसण्यासाठी.
त्या जन्माचे, हळवे संचित
माझ्या नयनी, का येते रे ?
देशभक्तीचे, अतूट नाते
इतिहासाने , सांगायाचे
भौगोलिक हा , वर्तमान मी
मीच आता मज, घडवायाचे…!
आयुष्यातील, अनेक स्वप्ने
मम देशाची , तीच नजाकत
तीच सावली , संस्कारांची
तिनेच मजला, घडवायाचे …!
या शब्दातून , या वाक्यातून
रंग अलौकिक , येती लहरत.
राष्ट्रध्वजासम , ध्येय निष्ठता
मम देहातून, यावी बहरत…!
रंग केसरी, मम स्वप्नांचा
चारित्र्याची, शुभ्र छटा.
हरित क्रांतीचा, मन शांतीचा
कुणी कुणाला, दिला वसा. ..!
प्रश्नासाठी , प्रश्न ही नाना
उत्तर अवघे , एकच माना
माणुसकीच्या, ध्येयाखातर
मुखी राहू दे, ध्येयवाक्यता .!
देश असा नी, देश तसा
खरे सांगतो, हसू नका.
या देशाच्या, ऐक्यासाठी
मीच पसरला, पहा पसा.!
जन्मा आलो, झालो जाणता
देशभक्तीचा, घेऊन वसा
म्हणून दिसला, दिसतो आहे
भारत माझा, भारत माझा. ..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈