सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ ‘चांद्रयान – ३‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!
शास्त्रज्ञांनी देखियले हो स्वप्न भव्य येथे,
इस्त्रोमधूनी हालवली मग पहा त्यांनी सूत्रे,
प्रयत्न त्यांचे आज पहा हे यशस्वी झाले,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||१||
चंद्रावरती प्रथम उतरूनी, विक्रम हा केला ,
जगामध्ये या वाजतसे हो भारताचा डंका,
बांधली राखी चांदोबाला, आज वसुंधरेने,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||२||
कडकडाट टाळ्यांचा झाला, दुमदुमली अवनी,
शास्त्रज्ञांच्या डोळ्यांमधूनी आनंदाश्रू झरती,
सार्थक झाले आज वाटते त्यांच्या तपस्येचे,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||३||
अपयशातून रचली आम्ही आज यशोगाथा,
ठेवू उन्नत सदैव आम्ही भारतभूचा माथा,
रवी-शुक्र हे लक्ष्य आमुचे, आता या पुढचे,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||४||
आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,
चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈