श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 203
☆ शालीन तंबोरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
पतंगासारखा होतो, कुणी हा छाटला दोरा
गगन हे भेदणारा मी, क्षणातच उतरला तोरा
☆
हृदय तू चोरुनी नेले, जरी कुलपात ते होते
कसा रे प्राणवायूतुन, उतरला आत तू चोरा
☆
सुका दुष्काळ पडलेला, ढगातुन होइना वृष्टी
तुला पाहून बरसूदे, असा तू नाच रे मोरा
☆
दुधावर साय धरताना, फसफसू लागले आहे
कमी कर आच तू थोडी, उतू जाऊ नको पोरा
☆
उतरते कर्ज श्वासाचे, कुडी सोडून जाताना
तनाचा सातबाराही, बघा झाला कसा कोरा
☆
असे अंधार पाठीशी, समोरी तू उभी आहे
नको ना दीप तू लावू, तुझा तर चेहरा गोरा
☆
रसिकता कालची येथे तुला दिसणारही नाही
सखे तू गा तुझे गाणे तुझा शालीन तंबोरा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈