श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 205
☆ विश्वविक्रमी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सहजासहजी आयुष्याला भिडतो तेव्हा
कर्मभूमिवर विश्वविक्रमी ठरतो तेव्हा
☆
तोच सिकंदर प्रेमामधले युद्ध जिंकतो
बाण मारुनी हृदय प्रियेचे चिरतो तेव्हा
☆
देहामधल्या अग्नी ज्वाळा तिला भावती
शेकोटीसम तिच्या सोबती असतो तेव्हा
☆
दशाननाची लंका देखील जळून जाते
चारित्र्याला तो नारीच्या छळतो तेव्हा
☆
चंदन होणे तसे फारसे अवघड नाही
होतो चंदन दुसऱ्यासाठी झिजतो तेव्हा
☆
वयोपरत्वे जरी वाकलो धनुष्य झालो
बाण निशाणा अजुन साधतो लवतो तेव्हा
☆
लोक म्हणाले जाणारच हा वय हे झाले
मृत्यूलाही भिती वाटते नडतो तेव्हा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈