प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ …ये … ना ….☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
सळसळ सळसळ पाऊस धारात ये ना ..
रानात पानात दवांत भिजत ये नां ….
मी धुंद अशी रे उभी पाण्यात
ओघळती मोती रेशमी मम केसात
दवांचे स्नान तू पहाटे घेऊन ये ना ..
अंधारले गूढ कसे आकाश ?
पाण्यावर लाटा तरंग सावकाश
मेघांची अंबारी घेऊन भेटाया ये ना …
क्षितिजावर रेषा दिसते काजळ काठ
मन हुरहुरले रे माझे आली लाट
मोहोरलेल्या त्या मिठीत मला तू घे ना .
रे डोंगर माथ्यावरती ते प्रपात
कोसळती धुव्वाधार ते पहा दिन रात
सावळ्या घनात नाचत पानात ये ना ..
थेंबात विरत पाण्यात पोहत ये ना …
रानात पानात दवांत भिजत ये ना …
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि:१४/०९/२०२०, वेळ:सकाळी :०९:४३
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈