सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ गौराई… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(अष्टाक्षरी)
आली आली हो गौराई,
असे माहेरवाशीण !
स्वागत प्रेमे करु या,
आज असे तिचा सण!
लेक मायेची, मानाची,
किती कौतुक हो तिचे!
सजली नटली गौरी ,
शृंगार तिला ही साजे!
रांगोळी घातली पहा,
जले माझे अंगण!
सोनपावले देवीची,
ओटीत घालते खण!
नथ घातली नाकात,
पायी पैंजण सोन्याचे!
कपाळी लाविला टिळा,
कुंकू लावी सौभाग्याचे!
धनधान्य ते विपुल,
येई तिच्याच पावली!
सावली अखंड राहो,
माझ्या मुलाबाळांवरी!
इतुके माझे मागणे,
हट्ट पुरव तू माझा
आशीर्वाद राहो नित्य,
माझ्या संसारात तुझा!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈