श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ पाऊस… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
जीवनाची ही न सोपी वाट आहे
रोज चकव्यांची नव्याने भेट आहे
जोडण्या नाती कुणाशी मी धजेना
आप्त..स्नेह्यांशीच माझी गाठ आहे
ठेविला ज्यांच्यावरी विश्वास होता
दाविली त्यांनीच आता पाठ आहे
‘ते’ लव्हाळे वेळ येता वाकणारे
सर्वकाळी झाड माझे ताठ आहे
ही भयाणी रात्र; मी निर्धास्त आहे
पौर्णिमेची रात्र पाठोपाठ आहे
प्रेम स्थायीभाव माझ्या अंतरीचा
राग; प्रीती सागरीची लाट आहे
खेळ स्वच्छंदी पतंगांचा म्हणे तो
(एकमेकांच्यात काटाकाट आहे)
प्रेम.. ताटातुट..दु:खे..ओढ..भीती
ही तुझी -माझी कथा भन्नाट आहे
तू नको देऊ न मागू उत्तरेही
मारली प्रश्नास मी त्या काट आहे
ही तुझी शाकारणी पाहून वाटे
शक्यता ‘त्या’ पावसाची दाट आहे
घास कष्टाच्या पुरेसा भाकरीचा
पंगतीचे ना हवे रे ताट आहे
जीवनाची ही अशी शाळा कशी रे
रोज दुःखी तास..दु:खी पाठ आहे
तोडुनी येतो प्रवाहाला जरी मी
विघ्नसंतोषी परंतू काठ आहे
टेकडीच्या पैल भेटीला उभी तू
राजरस्ता वाटतो हा घाट आहे
पंगती खोळंबल्या आहेत सा-या
एक तो माझा रिकामा पाट आहे
बोलती घोळून, त्यांना सर्व लाभे
मी असा हा, बोलणारा थेट आहे
हीन ही ना दीन लेखू आसवांना
आसवांनी घेतलाही पेट आहे.
देखणे..नाजूक आहे फूल; त्याचा
राठ (त्यासाठीच) झाला देठ आहे
रे विकायाला मला नेऊ कुठे मी
एवढी श्रीमंत कोठे पेठ आहे ?
माणसांच्या या समुद्री दूरचे ते
मी निनावी… निर्जनी मी बेट आहे
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈