सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “आमचा देश —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
ओल्या हिरव्या मोहकशा कुरणांचा हा तर देश —
ही कुरणे नाहीत गाई – गुरांची
नाहीत शेळ्या वा बकऱ्यांची
माणसेच चरती हो येथे
विसरून आपला वेश –
ओल्या हिरव्या मोहकशा कुरणांचा हा तर देश —
या कुरणी उगवतो कधी चारा
अन कधी तेलाच्या झरती धारा
नवी पिके तरी शोधण्यास
नित प्रतिभेला उन्मेष –
ओल्या हिरव्या मोहकशा कुरणांचा हा तर देश —
कापूस, साखर, गहू असे किती
सर्वांसाठी हवेच म्हणती
चरतांना परि भान विसरती
उसना फक्त आवेश –
ओल्या हिरव्या मोहकशा कुरणांचा हा तर देश —
म्हणू नका तुम्ही बी.आर.टी. वा
मेट्रो आम्हा हवी कशाला
तिथेच पिकती सुपीक कुरणे
प्रगतीला न प्रवेश –
ओल्या हिरव्या मोहकशा कुरणांचा हा तर देश —
आम्हा वाटते जळोत असली
मोहमयी कुरणे ….
…अन फक्त उरावा राकट कणखर
दगडांचा हा देश —
नकोच हिरव्या मोहकशा
कुरणांचा केवळ देश ——-
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈