श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ एकच आता तुम्हा सांगतो…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
नका उभारू पुतळे अमुचे नकोच जयजयकार
तिथी,जयंती नकोच आता,नको स्वार्थाचा बाजार
☆
खूप सोसले मूकपणाने नकोत कसलेही उपचार
नको आरत्या,नको भाषणे,नको फुलांचे हार
☆
नकोच आता सत्याग्रहही सत्य कुठे उरले ?
उपोषणाची नको नाटके खाणे अजीर्ण झाले
☆
मेळावे अन् सभा नको त्या नकोच कुठले धरणे
ध्येय सोडूनी भरकटणारी नकोत आंदोलने
☆
एकच आता तुम्हा सांगतो,नसलो जरी तुमच्यात
कणकण अमुचा झिजला होता या भूमीच्या सेवेत
☆
आमच्यासाठी नका करू रे,विचार पुढचा करा जरा
इतिहासाच्या पानावरती लिहाल का मजकुर खरा ?
☆
स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय तुम्ही भोगियले
हक्क सांगता खुशाल तुम्ही,कर्तव्या का विस्मरले ?
☆
तुमच्या नंतर असतील त्यांनी कुठे टेकवावा माथा ?
काय सांगतील तुमची महती ,गातील का तुमची गाथा ?
☆
क्षणभर थांबा,वळून एकदा पहा तुम्हाला काय दिसे ?
वर्तमान हा भविष्य घडवी काय तुम्हाला ज्ञात नसे ?
☆
एकदाच रे विचार करुनी एकदाच रे सत्य वदा
असे वागणे निर्मिल का गौरवशाली पुन्हा भारता ?
☆
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈