श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ फुलांनी…. ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(व्योमगंगा)
☆
व्हावे तरूण ताजे कोमेजल्या फुलांनी
उधळून गंध द्यावा गंधाळल्या फुलांनी
☆
चैतन्य वाटणारी झाली प्रभात आहे
नाचून गीत गावे बागेतल्या फुलांनी
☆
होवून स्वावलंबी सामर्थ्य दाखवावे
वा-यासवे डुलावे रानातल्या फुलांनी
☆
संधी मिळेल तेव्हा देवास भूषवावे
निर्माल्य होत जावे परडीतल्या फुलांनी
☆
लावण्य सुंदरीने केसात माळताना
थोडे तरी हसावे गज-यातल्या फुलांनी
☆
दिलदार प्रेमिकांचा संवाद ऐकताना
लाजून चूर व्हावे हातातल्या फुलांनी
☆
राहून शुद्ध साधे पण वेगळे असावे
डागाविना दिसावे चिखलातल्या फुलांनी
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈