☆ कवितेचा उत्सव ☆ फुलपाखरे ☆ श्री राजेंद्र परांजपे ☆
रंगबिरंगी पंख पसरुनी, झुलती, डुलती !
पुष्पापुष्पांतील मोदे ती मधुघट प्राशिती !
नाचती,बागडती, आनंदे नभी विहरती !
ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती!
नाजूक, कोमल तनू वाऱ्यावर झुलविती !
धरु पहाता हाती न येती, निसटुनी जाती !
निमिषार्धातच नच कळे, कुठे ती हरवती !
ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती !
क्षणी इथे क्षणी तिथे, नजर ठरु ना देती !
जीवनगंध पसरवती, मनी हर्ष फुलविती !
किमया विधात्याची,अद्भुत जीव निर्मिती !
ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती !
© श्री राजेंद्र परांजपे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈