श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ अवलिया… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
ओलांडुनिया पाचही पर्वत
एक अवलिया आला कोणी
भणंग भटका लक्तरलेला
तुटकी झोळी हाती घेउनी
तळव्यावरच्या भेगांमधुनी
रक्त ठिबकले, रक्त गोठले
अंगावरच्या रेषा दाविती
किती सोसले, किती भोगले
दिठीत दुख-या रुतून बसली
युगायुगांची अटळ व्यथा
रुख्या-सुख्या अधरांवरती
ओघळती मग करूण कथा
रुद्ध जाहले अवखळ निर्झर
मोती-दाणे झोळीत ओतूनी
मूक जाहले मर्मर मधुस्वर
स्वरवलयाचे देणे देवूनी
रंगरुपाचे वैभव अर्पून
पुष्पपाकळ्या विकल जाहल्या.
पाने पाने झोळीत टाकून
तरुतरुंच्या छाया सुकल्या.
भरली झोळी,
फकीर गेला
धुळी-मातीची विभूती लावूनी .
मलीन धुक्याचे लक्तर लेवून
सृष्टी बसली भणंग होऊनी .
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈