श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 214
☆ चंदन झालो… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तारुण्याच्या बागेमधल्या हिरव्या वेली
भुंगे आले जेव्हा होती फुले लागली
☆
फुलात नाही, खोडच आहे इथे सुगंधी
खोड चंदनी म्हणजे आहे कोरी हुंडी
झाडाला या म्हणून आहे दृष्ट लागली
☆
मोल तयाचे मोठे आहे त्यास न कळले
काळोखाचा घेत फायदा लुच्चे वळले
सळसळ होता या झाडाला भिती वाटली
☆
दुनिया करते पसंत मजला बरे वाटले
चांगुलपण हे मला भोवले पाय छाटले
चंदन झालो याची मजला सजा भेटली
☆
ईश्वर करतो माझी येथे अशी घाटणी
तुकड्यामधली काया आहे तरी देखणी
झिजून मरणे याची मीही शपथ घेतली
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈