श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ होरा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(आनंदकंद)
☆
माझा अजून माझ्या दिलबर मनात आहे
त्यांच्याच आठवांचे मी गीत गात आहे
चंद्रा समान त्याच्या नाजूक चेह-याचे
हसणे मला जरासे फुलवून जात आहे
हरवून मीच माझ्या आलो प्रकाश वाटा
माझ्या सभोवताली काळोख रात आहे
मिरवू कसे कळेना गर्दीत गौरवाच्या
शृंगारली व्यथानी माझी वरात आहे
वाहून खूप ओझे गेली थकून गात्रे
पाळून रीत साधी जगणे जगात आहे
कापूर मौन माझे आलेय आरतीला
पण ज्योत अंतरीची जळते उरात आहे
ओंकार वास्तवाचा घुमतोय आत माझ्या
मिसळून सूर त्याच्या गेला सुरात आहे
माझी खरी समाधी मागेच बांधली मी
तेथेच देह माझा रमतो सुखात आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈