श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ मनात माझ्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
फूल एक घमघमते आहे मनात माझ्या
जगणे ‘ते’ दर्वळते आहे मनात माझ्या
रखरखणारा वास्तवतेचा ग्रीष्म जरीही
झाड तुझे सळसळते आहे मनात माझ्या
उत्सवांस त्या टाळत आलो नेहमीच मी
भुके कुणी तळमळते आहे मनात माझ्या
जगतो आहे उदासीन मी मौनी होउन
बाळ गुणी अवखळते आहे मनात माझ्या
नयनमनोहर जरी किनारा; रेतीवरची
मासोळी तडफडते आहे मनात माझ्या
काळरात्र वादळी जीवनी जन्मापासुन
स्वप्न-उषा झगमगते आहे मनात माझ्या
जरी निवारा..थंडाई..ना चैन जिवाला
दुपार ‘ती’ धगधगते आहे मनात माझ्या
कसा दिगंती झेपावू या घरट्यामधुनी
विध्द पिलू फडफडते आहे मनात माझ्या
तुझ्या स्मृतींच्या येतिल धारा गर्जत..नाचत
नभ काळे गडगडते आहे मनात माझ्या
अडसर आहे नित्य आपल्यांचा…दैवाचा
खंत हीच ठसठसते आहे मनात माझ्या
ऐल..पैल..तू..मी.. आता, तरिही निर्झरशी
ओढ जुनी खळखळते आहे मनात माझ्या
घाव तुझा तो भरून येण्याजोगा नाही
दु:ख नित्य भळभळते आहे मनात माझ्या
शांत..सुखाने कसा जगू मी कळे न मजला
रोज नवे चळवळते आहे मनात माझ्या
जाऊ नको हस-या या चेह-यावर माझ्या
सर अश्रूंची झरते आहे मनात माझ्या
लाख सुखे भेटली तरीही फिकीच आता
रे कविता अवतरते आहे मनात माझ्या
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈