सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “ध्येय…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
खूप काही करायचं
मनात येतं आणि जातं
जमेल का आपल्याला
विचारात ते हरवून बसतं…
भीतीचं प्रस्थ मोठं
कृतीपुढे पडतं थिटं
आपलंच मन वागतं खोटं
चांगल्या विचाराला मागं सारतं …
मनात आलं की
सुरू करून पहावं
यश अपयशापलीकडे
प्रयत्नांच्या मार्गाने जावं …
ध्येय निश्चित करतानाच
यश आपलं ठरतं
कसं पोहचायचं तिथंवर
इतकचं पहायचं असतं…
मार्ग मिळतो चालता चालता
संधी वाटतो प्रत्येक अडथळा
यशापेक्षा प्रयत्नांचा काळ मोठा
अनुभवरुपी यशास नसे तोटा….
मोजमाप यशाचे
आपणच असते करायचे
नेहमीच परिपूर्ण असणे
कसे बरे जमायचे…?
आपण आपलं चालत रहावं
पाऊल एक एक टाकत रहावं
कळणार नाही आलो कुठंवर
ध्येयापलीकडेही खूप दूरवर…..
यशापलिकडेही चालावंच लागतं
एका यशानंतर जगणं का संपतं?
नव्या ध्येयासाठी मन पेटून उठतं
ठरवूनही तिथे मग थांबता न येतं ….
यश असतो एक मुक्काम
तिथे संपतं नसतं आपलं काम
ध्येय जगण्याचं सर्वात मोठं
आयुष्याच्या शेवटीच तिथं पोहचता येतं….
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈