श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
समजून घेतजाऊ वहिवाट या जगाची
जपतात लोक येथे नातीच फायद्याची
*
या बेगडी जगाला असतेच हौस मोठी
दुस-या समोर नुसते चमकून लाजण्याची
*
लाचार भाट येथे घेतात की सुपारी
खोटी मधाळ बोली रेटून बोलण्याची
*
हे साळसूद ढोंगी झालेत भक्त भोंदू
मिळते मुभा तयाना खैरात मागण्याची
*
नादान टोळक्याना जपतोय आज आम्ही
देतात तेच धमकी जाळून मारण्याची
*
झडतात रोज फैरी बेफाम घोषणांच्या
होते शिकार जनता जातीय भांडणाची
*
जो तो इथे स्वतःला समजून थोर घेतो
आलीय वेळ त्याला हटकून रोखण्याची
*
स्वातंत्र्य स्वैरतेने गोत्यात येत आहे
नाही तमा कुणाला धुंदीत वागण्याची
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈