कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 207 – विजय साहित्य
☆ दैवी वारसा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
भारत नाही, फक्त देश हा
भारत आहे, आदर्श व्यक्ती
मातृतुल्यही,पितृतुल्यही
अतूट नाते, जडली भक्ती…१
*
जन्मा आलो, झालो जाणता
अनुभवली, ममता माया
सदा सर्वदा, माझे वंदन
कुशीत याच्या,वत्सल छाया…२
*
हिमाचलाचे, मस्तक याचे
गौरी शंकर, विशाल अहा
काश्मिर आहे, शिरोभुषण
कुटुंब कर्ता,सौंदर्य पहा..३
*
चार दिशांचे, चार कोन हे
पुर्व पश्चिमी,प्रकाश दृष्टी
उत्तर आणि,दक्षिण प्रांती
देई भारत, विकास सृष्टि…४
*
विशाल बाहू, ऐक्य साधती
मानवतेचे, सुंदर धाम
सृजनशील , भारत माझा
भक्ती शक्तीचे, उज्वल नाम..५
*
कला संस्कृती,जरी वेगळी
पंजाब असा,बंगाल तसा
स्वर्ग धरेचा, गगनी दृष्टी
पेरीत जाई, संस्कार ठसा…६
*
रवी शशिचा, प्रकाश ठेवा
सागर आहे, याचे कोंदण
नर रत्नांचा, दैवी वारसा
देशभक्तीचे, लाभे गोंदण…७
*
भारत माझा,जन्मभूमी ही
तना मनाचे, केले तर्पण
महाराष्ट हा,माहेर माझे
अवघ्या इच्छा,त्याला अर्पण..८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈