प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ देवाघरी गेली आई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
देवाघरी गेली आई नाही सांगून ती गेली
अन्यायाची परिसीमा आई अशी कशी केली..
*
हक्काचे ते माझे ठाणे असे हरवून गेले
निराधार निराधार अगदी उघडी पडले
आठवता आई तुला मनी घालमेल झाली..
देवाघरी गेली आई …
*
कष्ट आठवता तुझे फार कणव ग येते
खंत वाटतेच मनी काही समजत नव्हते
आली समज ग जेव्हा माझी लढाई ठाकली..
देवाघरी गेली आई…
*
जातांना तरी भेटायचे बोलायचे होते आई
एका श्वासाचे अंतर तुला कळलेच नाही
छप्पर उडाले बघ गार सावली ती गेली..
देवाघरी गेली आई…
*
आहे तोवर भेटावे मनी गुज ते सांगावे
उद्याचा ना भरवसा आज प्रेम द्यावे घ्यावे
नको नको पश्चाताप प्रिय देवाला तू झाली..
देवाघरी गेली आई….
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈