कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 211 – विजय साहित्य
☆ माय मराठी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
माय मराठी मराठी, बकुळीचा दरवळ
दूर दूर पोचवी गं , अंतरीचा परीमल . . . !
*
कधी ओवी ज्ञानेशाची ,कधी गाथा तुकोबांची
शब्द झाले पूर्णब्रम्ह, गाऊ महती संतांची. . . . !
*
संतकवी, पंतकवी,संस्कारांचा पारीजात .
रूजविली पाळेमुळे, अभिजात साहित्यात. . . !
*
कधी भक्ती, कधी शक्ती,कधी सृजन मातीत
नृत्य, नाट्य, कला,क्रीडा,धावे मराठी ऐटीत. . !
*
माय मराठीची वाचा,लोकभाषा अंतरीची .
भाषा कोणतीही बोला,नाळ जोडू ह्रदयाशी . . !
*
कधी मैदानी खेळात,कधी मर्दानी जोषात.
माय मराठी खेळते,पिढ्या पिढ्या या दारात. ..!
*
कोसा कोसावरी बघ, बदलते रंग रूप.
कधी वर्हाडी वैदर्भी,कधी कोकणी प्रारूप. . . !
*
माय मराठीचे मळे ,रसिकांच्या काळजात.
कधी गाणे, कधी मोती,सृजनाच्या आरशात. . !
*
महाराष्ट्र भाषिकांची,माय मराठी माऊली
जिजा,विठा,सावित्रीची,तिच्या शब्दात साऊली . !
*
अन्य भाषिक ग्रंथांचे,केले आहे भाषांतर
विज्ञानास केले सोपे,करूनीया स्थलांतर. . . !
*
शिकूनीया लेक गेला,परदेशी आंग्ल देशा
माय मराठीची गोडी, नाही विसरला भाषा. . . !
*
नवरस,अलंकार,वृत्त छंद,साज तिचा .
अय्या,ईश्य,उच्चाराला,प्रती शब्द नाही दुजा.. !
*
माय मराठीने दिला,कला संस्कृती वारसा
शाहीरांच्या पोवाड्यात,तिचा ठसला आरसा. !
*
माय मराठीने दिली,नररत्ने अनमोल.
किती किती नावे घेऊ,घुमे अंतरात बोल. . .!
*
माय मराठी मराठी,कार्य तिचे अनमोल .
शब्दा शब्दात पेरला,तीने अमृताचा बोल. . !
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈