कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 212 – विजय साहित्य
☆ [1] नारी रूप [2] मानस पूजा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆ [1] नारी रूप ☆
(जागतिक महिला दिनानिमित्ताने..)
☆
घरा घरपण
जिच्यामुळे येते
पूर्ण रूप देते
नरा नारी…..! १
*
पती आणि पत्नी
शिव आणि शक्ती
प्रेम प्रिती भक्ती
भारवाही….! २
*
आई,बाई,दाई
वात्सल्य आगर
संसार सागर
नारी रुप….! ३
*
ताई,माई,अक्का
आज्जी,काकी,मामी,
गुणदोष नामी
सामावले….! ४
*
सखी,राज्ञी,माता
नारी शक्ती रूप
चैतन्य स्वरूप
ललना ही…! ५
*
संस्कार जनक
माहेरचा वसा
सासरचा ठसा
निजरूपी…! ६
*
भाव भावनांचे
मूर्त रूप नारी
सुख, दुःख, हारी
आदिमाया….! ७
*
विश्व वंदनीय
भाग्यश्रीची छाया
कविराज माया
कवनात…! ८
☆☆☆☆
☆ [2] मानसपूजा ☆
*
नमो शंकरा जपात आहे,
कैलासाची माया
शिव स्वरूपी,भालचंद्र तू,
चैतन्याची छाया.
*
निळी निळाई, फणींद्र माथा
चराचरी वास
शंख डमरू,त्रिशूलधारी,
ओंकाराचा न्यास.
*
निलकंठ तू, त्रिनेत्रधारी,
शोभे सिद्धेश्वर
ब्रम्हांडधीशा उमापती तू,
स्वामी विश्वेश्वर.
*
शिवपिंडीचा महादेव तू
नंदी भक्तगण
शिव नामाने,पहा व्यापिले
त्रैलोक्याचे मन.
*
पंचाक्षरीच्या,नाम जपाने
घेतो देवा नाम
पंचामृती ही,मानस पूजा
सेवा ही निष्काम.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈