सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ लावण्यवती ☆ सौ.मंजिरी येडूरकर

(गीत प्रकार – लावणी- सवाल – जवाब)

माय मराठी गौरव विशेष स्पर्धेतील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त  कविता.

प्रश्न – ऐका,

मराठी मायेचं कवतिक करशी, कूळ, मूळ मग सांग तिचं,

कुण्या देशीची, कुण्या वेशीची, काय ठावं या बोलीचं? ग ग ग ग

 

उत्तर –

संस्कृत आहे मूळ तिचं पण, कुळे असती अनेक गं,

म्हाईभटाचं,ज्ञानेशाचं, विनायकाचं अन् कितीक गं, ग ग ग ग

 

कधी वऱ्हाडी, मालवणी कधी,आगरी अन् अहिराणी गं,

तंजावर अन्  झाडी बोली, कधी रांगडी कधी लोणी गं, ग ग ग ग

 

प्रश्न –

कितीक भाषा भारतीयांच्या, श्रेष्ठ ठरे मग कशी ग ती?

सांग पटदिशी ठरो न अथवा, समद्यामंदी कनिष्ठ ती, ग ग ग ग

 

उत्तर –

अभंग, ओव्या, भारुड, लावणी,

कधी फटका, कधी पवाडं गं,

कधी विडंबन,भावगीत कधी, शायरीचं ना वावडं गं, ग ग ग ग

 

कथांचे तर प्रकार किती ते, नीतिकथा, विज्ञान कथा,

वैचारिक अन् अध्यात्मिकही, ललित, विनोदी आणि व्यथा, ग ग ग ग

 

अलंकार किती या भाषेचे, जरा मोजूनी पहा तरी,

एक जन्म ना पुरेल तुजला, फिरुनि येशील भूमीवरी, ग ग ग ग

 

काळासोबत बदलत असते, जरा कधी ना हिला शिवे,

सोळा स्वर मूळ चाळीस व्यंजन, दोन स्वरादी, स्वर दोन नवे, ग ग ग ग

 

एक शब्द घे नमुन्यादाखल, अनेक असती अर्थ इथे,

शब्द किती अन् अर्थ  एकचि, वळेल बोबडी तुझी तिथे, ग ग ग ग

 

नको विचारू पुन्हा प्रश्न हे, मापे सौंदर्या नसती,

कितीक सांगू सारस्वत ते, मुकुटी तियेच्या विराजती, ग ग ग ग

 

माय मराठी अमर असे गं, गुण गौरव ते वाढवती,

नव्या दमाचे, नव्या स्फूर्तीचे, नवे हिरे बघ लखलखती, ग ग ग ग

 

प्रश्नकर्ती-

हरले बाई तुझ्यापुढं मी, बोलती माझी अडली गं,

माय मराठी माझी देखिल, आतापासूनि लाडली गं, ग ग ग ग

 

चला सख्यांनो, करू आरती, माय मराठी भाषेची,

वाजव पेंद्या झांजा तू अन्, जय बोला मराठीची! जी जी र जी, जी  जी र जी,जी जी जी….

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments