श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 229
☆ प्रेम दिगंतर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
लोहमार्गाचे रूळ समांतर
बोलत नाहीत कधी अवांतर
*
जरी उभी तू पल्याड नदीच्या
दोन मनातील प्रेम दिगंतर
*
नजरेतून तू जरी बोलली
करतील डोळे हे भाषांतर
*
नदी मिळाली आज खाडीला
वाढत गेले भरपूर अंतर
*
चंद्र आभाळी कुठे थांबला
वाट पहाते वेळ ही कातर
*
टाकू का मी गादी म्हणालो
मला म्हणाली काळीज अंथर
*
तिच्यात नाहीच कुठे कस्तुरी
तिच्या भोवती तरीही अत्तर
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈