सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “कविता —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
कविता माळरानी
माझी कविता रानोरानी
हुंदडे बागडे स्वच्छंदें
मम कविता पानोपानी ….
*
कुणासवे अन कशी आली हो
आली ही कुठूनी
नजराणे नव उन्मेषाचे
सांगाती घेऊनी ….
*
साजण जणू हा निसर्गराजा
ओढ तयाची मनी
सुख दु:खातही त्याची सोबत
आली ही ठरवुनी ….
*
ऋतू ऋतूंचा रंग वेगळा
जाणून आपल्या मनी
साज आगळा डौल आगळा
येते पण सजुनी ….
*
वसंत येता कोकिळासवे
जाई मनी हरखुनी
सृष्टीसंगे आनंदाने
डोलत जणू ही मनी ….
*
वर्षेस भेटता तृप्तीने ही
टपटपते अंगणी
भाव मनीचे फुलून येती
मोरापरी नाचुनी ….
*
शिशिराची ती संगत न्यारी
मोहरवी निशिदिनी
शिरशिरी गुलाबी फुलताना
रोमांच हिच्या की मनी ….
*
ग्रीष्माच्या काहिलीत जेव्हा
धगधगते ही अवनी
सांगाव्यावाचून येई ही
सर वळवाची बनुनी ….
*
ही रुपे दाखवी वेगवेगळी
सौंदर्याची खनी
कोमेजो ना कधी ऊर्मी ही
प्रार्थनाच मन्मनी ………
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈