कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 217 – विजय साहित्य ?

 

मधुमास ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

ग्रीष्म ऋतूने, होई काहिली

चराचराने, उरी साहिली.

चैत्र पालवी, देई चाहूल

ऋतू राजाचे, वाजे पाऊल.

*

आला मोहर,आम्र तरूंला

रान फळांचा, घोस सानुला

कडे कपारी जांभूळ झाडे

करवंदाने, सजले पाडे.

*

हिरव्या चिंचा,चिमणी बोरे

शोधून खाती,उनाड पोरे.

फुले बहावा,पळस कधी

गुलमोहरी, चळत मधी.

*

फुलली झाडे,‌ झुकल्या वेली

गुलाब जाई, फुले चमेली

लक्ष वेधुनी ,घेई मोगरा

सुवर्ण चाफा,द्वाड नाचरा.

*

कोळीळ कंठी, सुरेल साद

वसंत आला, करी निनाद.

मंजूळ गाणी,मंजूळ पावा

कुठे दडूनी, बसला रावा.

*

गुढी पाडवा,आनंद यात्रा

कडूलिंबाची,हवीच मात्रा

पुरण पोळी, आगळा थाट

श्रीखंड पुरी, भरले ताट.

*

मशागतीची कामे सरली

तणे काढता,चिंता हरली.

उरूस जत्रा, गाव देवीची

निघे पालखी, आस भेटीची.

*

चैत्र गौरीची,गोकुळ छाया

वसंत कान्हा,उधळी माया

हळदी कुंकू,सजती नारी

मधुमासाची,करती वारी…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments