श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 233
☆ मोगलाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
दार उघडाया आता घाबरते चिऊताई
कावळ्याच्या रुपामध्ये नराधम दिसे बाई
*
रात्र झाली खूप होती झोपत का पिल्लू नाही
चिऊताई पिल्लासाठी गात होती गं अंगाई
*
पडताच अंगावर सूर्य किरणं कोवळी
झटकून आळसाला फुलल्या या जाई जुई
*
पाखरांची चिव चिव उठताच ही सकाळी
चारा शोधण्याच्यासाठी झाली साऱ्यांचीच घाई
*
तुला पाहताच घास बाळ आनंदाने खाई
साऱ्या बालंकांची तेव्हा असतेस तू गं ताई
*
चिमण्या ह्या गेल्या कुठे दिसायच्या ठायी ठायी
अचानक आली कशी त्यांच्यासाठी मोगलाई
*
नातं भावाचं पवित्र सांगा निभवावं कसं
आता तर गुंडालाही म्हणू लागलेत भाई
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈