सुश्री मंजिरी येडूरकर
कवितेचा उत्सव
☆ सप्तरंग इंद्रधनुचे ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
☆
आई सांगे,
इंद्रधनूच्या कमानीवरूनी गवसते स्वर्गाचे दार
कशास हवे जर, इथेच आहे, सौंदर्य अपरंपार
*
चला पाहू या ,सातरंगांची किमया ही मजेदार
तांबडा रंग आकाश धरेच्या मीलनाचा साक्षीदार
*
नारिंगी तर निसर्गाच्या अचाट शक्तीची धार
पिवळा भंडारा भक्तीचा अन् आरोग्याचा मूलाधार
*
हिरवाईने नटली धरणी, देते समृद्धीचा हात उदार
निळा दावी अथांगता, सात्विकतेचा शिल्पकार
*
पारवा न्यायाचा, निष्ठेचा, नि रूढी, परंपरांचा तारणहार
जांभळा सळसळणाऱ्या रक्ताचा, कणखरतेचा दावेदार
*
सात रंगांच्या एकरूपतेने होतो, धवलतेचा साक्षात्कार
जसे,त्रिगुणाच्या प्रभावाने बनतो, निर्गुण,निराकार!!!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈