श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 234
☆ घातकी श्वास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
येवढा विश्वास त्यावर, देह झाला दास होता
थांबलेला ऐन वेळी, घातकी तर श्वास होता
*
कोडमारा होत होता, मोडता चौकट न आली
उंबरा शालीनतेचा, माझिया दारास होता
*
पान मेंदीचे मनाला, भावले होतेच हिरवट
लाल केले हात त्याने, खेळला मधुमास होता
*
कंगव्याची पाच बोटे, मोगऱ्याने धुंद झाली
म्हणुन गजरा माळण्याचा, ध्यास ह्या केसास होता
*
चावुनी केला विड्याचा, तू जरी चोथा तरीही
रंगण्याचा छंद येथे, केवढा कातास होता
*
अन्नपूर्णा या घराची, रांधणारी वाढणारी
वैभवाचा वारसाही, आमच्या वंशास होता
*
चूल होती जाळ होता, होम होता पेटलेला
धूर राखेशी घरोबा, वाढलेला खास होता
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈