सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ उदेला भाग्यरवी… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले

आनंदाश्रू गालावरती सहजची ओघळले ||

*

सुहास्य मुद्रा कमल लोचनी वत्सल मोहक भाव

हास्य तयाचे वेधुन घेते मनामनाचा ठाव

सगुण शुभंकर रघुरायाचे बालरूप भावले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||१||

*

रत्नजडित हा मुकुट वाढवी मुखकमळाचे तेज

कानी कुंडल जणू फाकती नवरत्नांचे  ओज

असीम सुंदर लावण्याने रोमांचित जाहले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||२||

*

दिव्य भूषणे भूषविताती रामचंद्र देखणा

रूप पाहुनी भान हरपते नाम मुखाने म्हणा

पूर्व पुण्य  मम थोर म्हणुनिया दर्शन सुख लाभले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||३||

*

कोदंडराम रक्षणास घे रामबाण हा करी

आश्वासक ही वत्सल दृष्टी कृपावर्षाव करी

शुभचिन्हांनी मूर्तीभवती प्रभावलय फाकले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||४||

*

अयोध्यापुरी प्राप्त जाहली गतवैभवास आज

अवघी सृष्टी धारण करते आनंदाचे साज

नगरीमधुनी पौरजनांचे हास्य मधुर गुंजले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||५||

*

शतकांच्या या प्रतीक्षेतुनी उदेला भाग्यरवी

चराचराच्या आशा फुलल्या वाट गवसली  नवी

कालचक्र हे नवीन फिरले परिवर्तन जाहले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||६||

*

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले

आनंदाश्रू गालावरती सहजची ओघळले ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments