सौ. गौरी गाडेकर
कवितेचा उत्सव
☆ शिस्त… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
☆
अब्जावधी प्रकाशवर्षं व्यापून राहिलेल्या
अफाट विश्वाती ल
अनंत अवकाशातील
अगणित आकाशगंगा
त्यातले असंख्य ग्रहतारे
अनादी कालापासून
भ्रमण चाललंय त्यांचं
आपापल्या कक्षेत
आपापल्या गतीने
एका शिस्तीत
विज्ञानाधिष्ठित नियमांत.
म्हणूनच तर शक्य झाला ना
श्रीरामाच्या भाळावरचा सूर्यतिलक अचूक वेळेला.
ग्रहणं, वेध…. सर्व काही
नियमांत बांधलेलं
गणिताने अचूकरीत्या
वर्तवता येणारं
निसर्गचक्रही फिरत असतं शिस्तवार
सागर, नद्या, डोंगर
सगळेच निसर्गाच्या नियमानुसार
प्राणी, पक्षी, झाडं, वनस्पती
जलचर, भूचर, उभयचर
सगळ्यांचीच जीवनचक्रं,
विणीचे, पुनरुत्पादनाचे मोसम विज्ञानाधिष्ठित
गणिती धारणांनी आखीवरेखीव
म्हणून तर
करोडो कोसांचे अंतर
पार करून
स्थलांतर करणारे पक्षी
पोचतात योग्य वेळी
योग्य ठिकाणी
सर्व शिस्तबद्ध
निसर्ग नियमांनुसार
याला अपवाद एकच
निसर्गाचा लाडका पुत्र: मानव
नव्हे,
लाडावलेलं, बिघडलेलं कार्टं :माणूस
सगळे नियम, सगळी शिस्त
धाब्यावर बसवून
निवळ आपल्या स्वार्थासाठी
वागतोय मनःपूत, बेशिस्त
आणि त्यामुळेच
शिस्तशीर वागणाऱ्या
निसर्गाचाही
ढळलाय तोल.
☆
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈