कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 221 – विजय साहित्य
☆ व्यासंग ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(काव्य प्रकार: अष्टाक्षरी)
☆
माणसांनी माणसांची
पहा लावलीया वाट
रोज नविन समुह
संख्या सतराशे साठ..!१
*
प्रत्येकाची मते भिन्न
वेग वेगळे विचार
हवा आहे ज्याला
त्याला डिजिटल पुरस्कार …!२
*
नको कोणा उपदेश
चुका नाही सांगायच्या
टायपिंग मिस्टेक त्या
अंगीभूत मानायच्या…!३
*
कशी लिहावी कविता
अवांतर वाटे बोध
कवितेच्या पसंतीला
अंगठ्याचा घ्यावा शोध…!४
*
स्पर्धा नकोच असते
नको वाटे उपक्रम
धाब्यावर ठेवतात
पारंपारीक नियम…!५
*
पेटी वाटते पोष्टाची
जाती मेसेज टाकून..
किती जणांनी वाचला
नाही पहात ढुंकून…!६
*
जिथे होतो उदोउदो
तिथे करतात गर्दी
कुठे सुंदर ग्राफिक्स
तिथे जमतात दर्दी..!७
*
कौतुकाची कौतुकाला
आस आहे लागलेली
पहा चिंतना आधीच
पोस्ट यांनी धाडलेली..! ८
*
परीक्षण नको यांना
नको वाटे मनोगत
बक्षीसांची संख्या म्हणे
यांची वाढविते पत..! ९
*
गटबाजी करुनीया
काही काळ नांदायचे
नाही पटले विचार
मनसोक्त भांडायचे..! १०
*
अभिजात साहित्याचा
जिथे प्रचार प्रसार
हवा सशक्त समुह
प्रतिभेचा आविष्कार..!११
*
ध्येयवादी साहित्याचा
जिथे घडतो व्यासंग
साहित्यिक रसिकांनी
व्हावे त्याच ठायी दंग…!१२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈